Dhananjaykoshti's Blog

मी धनंजय कोष्टी बोलतोय….

चादरीचे माहेरघर सोलापूर

सोलापूरी चादर


चप्पल म्हटलं की जसं कोल्हापूरचं नाव येतं तसं चादर म्हटलं की आपसुकच सोलापूरचं नाव येतं.. त्यामुळचं सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलसाठी या शहराचं नाव आहे.. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागातले व्यावसायिक तसच ज्यांचा सोलापूरशी काही ना काही कारणानं संबंध आलाय ते आवर्जून सोलापूरी चादरीचा आग्रह धरतात.. तुम्ही जर सोलापूरला भेट देणार असाल किंवा तुळजापूर, अक्कलक्कलकोट, गाणगापूर, विजापूर, हैदराबादला भेट देणार असाल तर तुम्हाला सोलापूरातून जावं लागेल..त्यात जर स्वताच्या वाहनानं जाणार असाल किंवा सोलापूरात हॉल्ट घेणार असाल तर, एकदा सोलापूरच्या चादरी आणि टॉवेल्सच्या शोरुम्सना जरुर भेट द्या.. ! त्यातच तुम्ही जर सोलापूर शहराच्या पूर्व भागात गेलात तर तुम्हाला मनसोक्त खरेदीचा आनंद लुटता येईलं… कारण याच भागात चादर- टॉवेल्सच्या कंपन्यांची शोरुम्स आहेत..शहराच्या इतर भागात आणि मुख्य बाजारपेठेतही या चादरी तुम्हाला मिळतातच..पण खरेदीचा आनंद लुटायचा असेल तर या पूर्व भागातल्या शोमरुम्सनाच भेट द्या…!! पुलगम, चाटला, कोंडा, क्षिरसागर, गांगजी अशी अनेक नावं घेता येतील..! कोणत्याही शोरुमला भेट द्या..! तुम्ही चादर, टॉवेल, बेडशिट्स यांचा खजाना पाहून चाट पडाल.. तुम्हाला शॉपींगचा कंटाळा येत नसेल तर मनसोक्त वेळ काढा आणि या दुकानांना भेट द्या..

सोलापूरी चादरींचा दर्जा एकदम उत्तम आहे..अगदी २०० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत तुम्ही एक चादर घेऊ शकता..अनेक व्हरायटी आणि रंगसंगतीच्या चादरी तुम्हाला इथं मिळतील. मयुरी पंखी चादर ही तर सोलापूरी चादरीची खासियतच आहे.. त्यानंतर बेटशिटच्यासुद्धा अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील.. टॉवेल म्हटल्यावर कॉटनच्या टॉवेलपासून टर्किश टॉवेलपर्यंत सर्व प्रकारचे टॉवेल्स तुम्हाला आवडतील असे आहेत..लुंगी हा दक्षिणेतला प्रकार असला तरी आपल्याकडेही अनेकजण लुंगी वापरतात..रंगीत लुंगीचे प्रकारही खूप प्रमाणात तुम्हाला पहायला मिळतील.. माझं हे सर्व वर्णन वाचत असतानाच तुमच्या डोळ्यासमोर सोलापूर चादरीचं शोरुम उभं राहिलं असेल..! हे लिहित असताना माझ्या डोळ्यासमोरही सोलापूरातली १०-१५ शोमरुम्स उभी राहिली… खरंच तुम्ही प्रेमात पडावं अशा उत्तम दर्जाची, रंगाची आणि पाहताच तुम्हाला ती खरेदी करावी असं वाटेल अशाच आहेत या सोलापूरी चादरी आणि टॉवेल्स…!

वस्त्रोद्योगातला चादर आणि टॉवेल निर्मिती हासुद्धा मोठा व्यवसाय आहे..सोलापूरच्या ज्या पूर्व भागाचा मी उल्लेख केला..त्या भागातून तुम्ही फेरफटका मारतानाही तुम्हाला पॉवरलुम्सचा आवाज कानी पडेल.. तर काही ठिकाणी रंग दिलेले धागे वाळत टाकलेले दिसतील..हा झाला छोट्या प्रमाणातला उद्योग…! तर शहराला लागूनच असलेल्या अक्कलकोट एमआयडीसीतसुद्धा अनेक लहान मोठ्या कारखान्यातून या चादर आणि टॉवेल निर्मीतीचा खडखडाट तुम्हाला ऐकायला मिळेल….हा उद्योग जरी सोलापूर शहरात असला तरी तो प्रामुख्यानं तेलुगु भाषिक लोकांचा व्यवसाय आहे. वर मी ज्या काही नावांचा उल्लेख केला त्यावरुनच तुमच्या लक्षात आलं असेल की, ही काही मराठी नावं नाहीत..ती सर्व तेलुगु भाषिक लोकं आहेत.. अनेक वर्षापूर्वी त्यांनी या शहरात ह्या उद्योगाची पायाभरणी केली आणि आजही ते हा उद्योग टीकवून आहेत.. सोलापूरात तयार होणा-या या चादरी आणि इतर माल हा देशभरातल्या बाजारपेठात तर जातोच पण मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यातही होते…सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलला परदेशातूनही मोठी मागणी आहे. म्हणूनच या सोलापूरी चादरीची चमक आजही टीकून आहे..
एक व्यवसाय म्हणून त्यांच्यासमोर आज अनेक अडचणी आहेत..करांचा वाढता बोजा. कामगारांचा पगार, विजेचे भारनियमन, सुताचे वाढलेले दर, व्हॅट यामुळे हा व्यवसाय राहतो की काळाच्या ओघात बंद पडतो अशी अवस्था झालीय. यातून सरकारनं काही कर सवलती दिल्या, वीजेचा मुबलक पुरवठा केला तर हा उद्योग टिकेलच पण त्यात वाढही होईलं.. तसच निर्यातीला चालना देऊन विमानसेवाही सुरुळीत सुरु केली तर सोलापूरची शान असलेला हा उद्योग आणखी भरारी घेईल…त्यासाठी गरज आहे ती सरकारी पातळीवर प्रयत्न होण्याची. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय उर्जा मंत्री आहेत. ते मागची ३५ वर्षे सत्तेत वेगवेगळ्या पदावर आहेत..तर शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री आहेत.. हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी यात लक्ष घातलं तर हा उद्योग तग धरु शकेल आणि तसं झालं तर सोलापूर चादरीचा रंग फिका पडणार नाही…
पण व्यवसाय टीकवण्याची त्या- त्या घटकांची जबाबदारी आहेच..पण सध्या तरी हा उद्योग सुरु आहे, त्यामुळे तुम्ही सोलापूरला भेट दिलीच तर थोडा वेळ हा चादर, बेडशीच्या शॉपिंगसाठी द्या… आणि समजा तुम्हाला जाणं शक्यच नसेल तर तुमचे सोलापूरचे जे मित्र आहेत आणि तुमच्याबरोबर कामाला किंवा शेजारी रहायला असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना सांगा… येतोच आहे तर आमच्यासाठी काही चादरी आणि बेडशिट घेऊन ये बाबा…. मला खात्री आहे..तुम्हाला त्या नक्कीच पसंत पडतील.. मग काय घेणार ना आमच्या सोलापूरी चादरी…!!!!

मुंबईत पुन्हा आवाज शिवसेनेचाच..

बाळासाहेबांचा करिश्मा

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलाय..यावेळीही शिवसेनेला निवडणूक सोपी नव्हती..खरच सोपी नव्हती..मनसेच्या इंजिनाचा वाढलेला वेग आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी यामुळे शिवसेनेला निवडणुकीत दगाफटका होण्याची भाकितं वर्तवली जात होती..कदाचित जास्त जागा मिळाल्या तरी राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी हात पसरावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ही सगळी भाकितं खोटी ठरवत शिवसेना भाजप रिपाइं युतीचा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर फडकलाच…
निवडणुकीपूर्वीचं वातावरण लक्षात घेवून शिवसेनेनं रामदास आठवलेंना हाक दिली आणि राजकीय अडगळीत पडलेल्या आठवलेंनाही दुसरं मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं. या निवडणुकीच्या निकालात रिपाइंचे दोनच उमेदवार निवडून आले असले तरी दलित समाजाची जी मतं आठवलेंच्या पाठिशी आहेत त्या मताचं दान यावेळी युतीच्या पारड्यात पडल्यामुळे युतीचा अवघड विजय सोपा झाला.. त्यामुळेच मनसेचा उधळलेला वारु जरी जोरात असला तरी त्याचा दगाफटका युतीनं आठवलेंच्या मदतीनं थोपवला असं म्हणता येईलं, किंबहुना मनसेमुळे होणारा धोका थोपवण्यासाठी आठवलेंच्या मतांचा त्यांना फायदा झाला.. सेनेची आकडेवारी खाली आली असली तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अडचण येणार नाही..तर दुसरीकडं दोन्ही काँग्रेसही युतीचा झेंडा खाली खेचण्यासाठी एकत्र मैदानात उतरले पण त्यांना ते जमलं नाही..उलट मागच्यावेळी स्वतंत्र लढून जेवढ्या जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या त्याही त्यांना राखता आल्या नाहीत…

शिवसेनेचा झंझावात

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर त्याची अनेक कारणं देता येतील..मुंबईत नेहमीप्रमाणं यावेळीही मतदानानं ५० टक्क्यांचा आकडाही पार केला नाही..त्यामुळे ज्यांनी मतदान केलं ते अर्थातच युतीला फायद्याचं झालं..लोकांना बदल हवा असेल तर मतदानही तेवढ्याच जास्त प्रमाणात होणं अपेक्षीत होतं. त्यामुळेच की काय कमी मतदान हे युतीच्या पथ्यावरच पडलं..दुसरं असं की ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या निवडणुकीनंतर संपेल अशी भविष्यवाणी केली.राजकीयदृष्ट्या ही टीका शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबणं साहजित होतं..तोच धागा शिवसेनेनं पकडला आणि पुन्हा भावनिक मुद्दा पुढं आला..तर दुसरीकडं शिवसेनेवर ४० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तोही विरोधकांवर बुमरॅग होऊन उलटला..तसच काँग्रेसला अंतर्गत वादही यश मिळवण्यात अडथळा ठरला..प्रचाराचं नियोजन नाही की सर्व नेत्यांना एकत्र करता आलं नाही. याचा परिणाम झालाच..कृपाशंकरसिंग यांनी तर मुंबईची सत्ता खेचून आणतोच आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतोच अशा आविर्भात सगळी सुत्रं हाती घेतली..कदाचित ती नारायण राणे, विलासराव, गुरुदास कामत यासारख्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नसावं.
तर दुसरीकडं परप्रांतियांच्या आक्रमणाचा मुद्दा, भूमिपुत्रावरचा अन्याय या विषयावर स्थानिक मतं एकत्र होतात. तर काँग्रेससारखे सत्ताधारी पक्ष त्यांकडं दुर्लक्ष करतात..कृपाशंकरसिंग, संजय निरुपम, राजहंससिंह, यासारखे उत्तर भारतीय नेते मुजोर होत आहेत. त्याचा रागही स्थानिक लोकांच्या मनात राहतोच..उत्तर भारतातून पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी आता स्थानिकांना गुरकावतायत..!! तो संजय निरुपउद्योगी ( निरुपम ) मुंबई बंद करण्याची भाषा करतो..!! कुठून आला त्याला हा माज..? कोण तो उपटसुंभ.. ? कुणाच्या जोरावर मुंबई बंद करण्याची भाषा करतो तो..? तर दुसरीकडं म्हशीच्या गोठ्यात काम करणारा तो कृपाशंकर म्हशीवाला…!! कोकणात शंभर एकरापेक्षा जास्त जागा घेतो..उत्तर भारतीयांना एकत्र करुन स्थानिकांना डावलतो. हे मुंबईतल्या भूमिपुत्रांनी का सहन करायचं..? एकच उदाहरण देतो..मुंबई काँग्रेसचा अद्यक्ष असणा-या कृपाशंकरसिंगांची उमेदवार यादी पहा..१६९ जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातल्या फक्त ८९ जागा मराठी लोकांना आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना! हे कसं सहन करायचं..? याच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतला गटनेता राजहंससिंह पालिकेतला कारभार हिंदीत चालवा म्हणून आग्रह धरतो..! हे सर्व मराठी माणूस सहन कसं करेल…? शिवसेना भाजपा युतीचा महापालिकेतला कारभार फार काय चांगला आहे असा त्याचा भाग नाही..आणि त्यांनी काही “करुन दाखवलं” म्हणून त्यांची सत्ता आली असंही म्हणता येत नाही..पण ” त्या उप-यांच्या” हाती सत्ता देण्यापेक्षा आपली माणसं का नको हे गणितही त्यामागं आहे..
कारणं काहीही असो..! देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्ष सत्तेसाठी डोळा ठेवून असतात.२१ हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे या मुंबई महानगरपालिकेचं..! केंद्रातूनही मोठी आर्थिक मदत मिळत असते मुंबईला..!त्यामुळे ही सोन्याची कोंबडी आपल्या पक्षाकडे असावी यासाठी सर्व पक्ष अगदी आसुसलेले असतात…
मुंबईत आवाज कुणाचा म्हणून विचारण्याचं धाडसही नव्हतं तेव्हाही मुंबई शिवसेनेकडेच होती आणि आता मुंबईतला सेनेचा आवाज कमी झाली असली तरीही मुंबई शिवसेनेचीच आहे..आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत तरी ती शिवसेनेचीच राहिल हे सांगण्यासाठी आता कोणा ज्योतिष्याची गरज नाही…पण या निकालामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर मानानं डौलत राहतोय ह्यातूनच बाकीच्या फालतू नेत्यांनी काय तो धडा घ्यावा हेच या निकालाच्यानिमित्तानं सांगणं आहे…!!!!
जय महाराष्ट्र..!!

मनसेचे इंजिन सुसाट…

राज ठाकरे

राज्यात झालेल्या १० महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले..त्यात अपेक्षेप्रमाणं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच मुख्य लढत होती.. महानगरपालिकांमध्ये मात्र शिवसेना भाजपचा काही शहरात चांगला दबादबा आहे. त्यामुळे तिकडंही लक्ष होतच..जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही काँग्रेसनं बाजी मारली..पण या सर्व निकालात भाव खाऊन गेला तो राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष.. खरचं..फक्त मुंबईतच या पक्षाची ताकद वाढली असं नाही तर नाशिक, पुणे या शहरातही मनसेचं इंजिन सुसाट सुटलं.. नाशिक महापालिकेत तर भाजप सेना युतीची सत्ता उलथवून लावली आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाही दूर फेकून सर्वात मोठा पक्ष ठरला..१२२ पैकी ४० जागा जिंकून मनसेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला..आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्यात..त्यामुळे भाजपच्या १४ नगरसेवकांसह अपक्षांचा पाठिंबा घेऊन मनसेचा पहिला महापौर होण्याचा मान नाशिकला मिळण्याची दाट शक्यताय..तशा हालचालीही सुरु झाल्यात..मनसेच्या इंजिनापुढं सगळे पक्ष भूईसपाट झालेछगन भुजबळांसारखा कसलेला मातब्बर नेता, सोबतीला सत्ता-संपत्ती तर दुसरीकडं शिवसेना भाजप युतीची सत्ता..पण या दोघांना टक्कर देत मनसेनं सगळ्यांना बोटं तोंडात घालायला लावली..

पुण्यातही अजित पवारांनी कलमाडींच्या अनुपस्थितीचा फायदा उठवत एकहाती सत्ता घेण्यासाठी जंग जंग पछाडलंपण कुठलं काय. एकहाती सत्ता तर सोडाच..पण ज्या काँग्रेला गाडण्यासाठी सगळा अट्टाहास केला त्याच काँग्रेससमोर पुन्हा अजितदादांना पाठिंब्यासाठी हात पसरावे लागले..तर २९ जागा जिंकून मनसेनं पुण्यातही मोठी मजल मारली..पुणे आणि नाशकातलं मनसेचं हे यश खूप काही सांगून जातय. तर मुंबईतही मनसेनं ७ जागांवरुन २८ वर मजल मारलीय..तर ५२ जागांवर दुस-या क्रमांकाची मतं मनसेनं घेतलीत..मुंबईत मनसे किंगमेकर झाली नसली तरी त्यांच्या निकालाचं विश्लेषण सर्वच पक्षांचा विचार करायला लावणारं आहे.. हेच पहा.. माहिम, दादर, प्रभादेवी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेनं मुसंडी मारत तिथल्या जागा जिंकल्यात..दादरमधल्या तर सगळ्याच सात जागा मनसेनं जिंकून शिवसेनेला धोबीपछाड दिलीय..उत्तर मुंबईतले मागाठाणे, कांदिवली तर पूर्व उपनगरातल्या विक्रोळी, चांदिवली, विहार लेक, कुर्ला भागातूनही मनसेचे उमेदवार विजयी झालेत..तर पश्चिम भागातल्या सांताक्रुझ, जोगेश्वरी या भागातूनही मनसेनं आपली ताकद दाखवून दिलीय..तर ७ ते ८ उमेदवार पाचशेपेक्षा कमी मतांनी पराभूत झालेत..मुंबईतलं हे चित्र पाहिल्यास मनसे ही शिवसेनेला धोक्याची घंटा आहे हे त्यांनी यातून लक्षात घ्यायला हवं..

शहरी भागातच नाही तर मनसेनं ग्रामिण भागातही काही ठिकाणी खातं उघडलंय..चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या भागातही मनसेनं खातं उघडलं..औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसेनं शिवसेनेला धक्का देत जमिनीवर आणलं..जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची असेल तर मनसेची साथ घ्यावी लागणाराय. हे ठळक निकाल आहेत. राज ठाकरे हे तर मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशकातच प्रचाराची एक एक सभा आणि एक एक रोड शो करण्यात व्यस्त होते. ते राज्याच्या इतर भागात गेले सुद्धा नाहीत..तरिसुद्दा त्यांच्या पक्षाचं खातं अनेक ठिकाणी उघडलं गेलय

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय. हे मागच्या सहा वर्षात झालेल्या विविध निवडणुकीतल्या विजयातून दिसतच आहे. विधानसभेला १२ आमदार जिंकूनच मनसेनं सर्वांचे डोळे उघडले..तरीही हा करिश्मा फारसा टिकणार नाही असाच होरा अनेकांचा होता..पण आता झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडमुणीचे निकाल पाहिल्यानंतर मात्र सर्वच पक्षांना विचार करायला मनसेनं भाग पाडलंयमनसेच्या इंजिनाचा वेग असाच राहिला तर अडीच वर्षानंतर येणा-या विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांची कसोटी लागणाराय हेच या निकालावरुन दिसतय..बाकी सर्व लवकच आपण पाहू..तोपर्यंत पुढच्या वाटचालीस राज ठाकरेंच्या या मनसेला शुभेच्छा..

प्रेमाच्या गावा जावे, पण..१४ फेब्रुवारीला नाही..

बाजारातले विकतचे प्रेम


दोन दिवसापासून वर्तमानपत्रातल्या जाहिरातींचा रंग गुलाबी झाल्याचं दिसलं. त्यातच ५० टक्क्यांची सुट, एकावर एक फ्री, हॉटेलच्या स्पेशल ऑफरच्या जाहिराती पाहिल्या आणि लक्षात आलं अरे १४फेब्रुवारी आली वाटती..त्याशिवाय काही या गुलाबी जाहारीती एवढ्या गर्दी करुन दिसल्या नसत्या..या जाहिराती पाहिल्या आणि वाटलं आज प्रेमाबद्दलच काहीतरी लिहूया…
१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला…? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी…! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको…
आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय…? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही…
प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय…त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार…हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते…
“ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते…
आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती…
“प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं “

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची…
तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा…आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर….
“मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..”
एवढं पुरं आहे तुमच्या भावना व्यक्त करायला आणि पुढच्या काही ओळीसुद्धा जरुर लक्षात ठेवा. म्हणजे प्रेम काय असतं ते कळेल.. कुसुमाग्रजांनी प्रेम करणा-यांसाठी लिहिलेल्या ह्या ओळीसुद्धा जरुर लक्षात ठेवा…
“प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा,
मेघापर्यंत पोचलेलं..
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं.”
एवढं सगळं सांगितल्यानंतर आता १४ फेब्रुवारीचा हट्ट कशापायी करायचा. ? मग ठरलं तर..
प्रेम करा भि्ल्लासारखं बाणावरती खोचलेलं…
ऑल दी बेस्ट….
( या ब्लॉगमध्ये दिलेला कवितांचा संदर्भ हा महान कवी मंगेश पाडगावकर आणि कवी कुसुमाग्रज यांच्याच आहेत. ते शब्द माझे नाहीत..विषयाला आशय यावा म्हणून त्या कवितेतल्या काही ओळी जशाच्या तशा घेतलेल्या आहेत..)

कोंबडीचा आणि तंगडीचा बोलबाला…

निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप काही नवीन नाहीत. ते तर नेहमीच होतात. त्यातच अलिकडे या आरोप प्रत्यारोपाची पातळीही खूपच खाली घसरल्याची ओरड होताना दिसतेय. कारण विकासाच्या मुद्यावर बोलावं असं निवडणुकीअगोदर सर्वचजण म्हणत असतात..पण प्रचाराचा जोर जसजसा वाढत जातो तसतसी आरोपाची धार तीव्र करत त्याची पातळीही घसरताना दिसतेय.. प्रत्येक निवडणुकीत काहीना काही मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी असतो.. पण यावेळच्या झेडपी आणि महानगरपालिका निवडणुकीत मुद्दाच गायब झाला..! कोणत्याही मु्द्यावर जोर दिल्याचं दिसलं नाही..पण महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आणि प्रचारात अचानक “कोंबडी” भाव खाऊन गेली.. शरद पवारांनी त्याची सुरवात केली. मुंबई ही शिवसनेच्या खुराड्यातली सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असा मुद्दा मांडताच त्यावर शिवसेनेचे नेते तुटुन पडले. तुटुन पडले म्हणजे कोंबडीवर नाही, तर पवारांच्या आरोपाचा समाचार घेण्यास तुटुन पडले. उद्धव ठाकरेंनी त्यावर तोफ डागलीच.. “पवारांना कोंबडी आणि तंगडीशिवाय दुसरं काही दिसत नाही” असा टोला त्यांनी मारला. पण बाळासाहेंबांनी जेव्हा या कोंबडीचा तुकटा पाडला तो आपल्या खास ठाकरी शैलितच.. खरं तर पवारसाहेब चुकलेच..कलानगरात कोंबडी नाही तर कोंबडे राहतात असा टोला त्यांनी मारला..त्यावरच थांबतील तर ते बाळासाहेब कसले.. त्याच्यापुढे जाऊन त्यांनी पवार आणि त्यांची आवडती कोंबडी याचं गुपितही सांगून टाकलं..त्यामुळे प्रचारात कोंबडीचा भाव वधारला..!!!

राजकारण, राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा कोंबडी आणि तंगडीशी संबंध येतोच येतो.. त्यातच निवडणुकीचे दिवस म्हटल्यावर तर कोंबडीचा भाव अगोदरच वधारलेला त्यात तंगडी तर मागं कशी राहणार..कार्यर्त्यांना खूष करण्यासाठी कोंबड्यांच्या पार्ट्या होतातच..! निवडणुका ह्याच तर या कार्यकर्त्यांची दिवाळी.! मग काय कोंबडी आलीच ना.. !तीही साग्रसंगितच…! आतापर्यंत ती ढाब्यावर असायची. यावेळी ती थेट प्रचारात उतरली..तसा कोंबडीचा धुमाकुळ मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात सुरुच आहे.. जत्रा या मराठी चित्रपटातलं ” कोंबडी पळाली तंगडी धरुन.” या गाण्यानं अख्या महाराष्ट्राला वेड लावलं.. ती कोंबडी मग हिंदीत गेली आणि कॅटरिनाच्या मदमस्त तंगडीतोड डान्सवर पुन्हा एकदा खूप पळाली.. तिथून तिनं उडी मारली ती थेट निवडणुकीच्या फडातच…!

महाराष्ट्रात कोंबडीचा बोलबाला सुरु असताना शेजारच्या कर्नाटकात मात्र तंगडीचा बोलबाला होता. कर्नाटकच्या विधानसभेत तीन मंत्रीमहोदय सभागृहात कामकाज सुरु असताना मोबाईलवर कुठल्यातरी मॉ़डेलच्या उघड्या नागड्या तंगड्या बघण्यात दंग होते. ते ” नयनरम्य दृश्य “टीव्ही कॅमे-यानं टिपलं आणि अख्या जगानं बघीतलं.. अरेरे, काय म्हणावं या मंत्रीमहोदयांना! काही वेळेचं ताळतंत्र तरी.. ? पण साहेबांचं मन काय सभागृहातल्या कामकाजात रमत नव्हतं म्हणून की काय टाईमपाससाठी त्यांनी मोबाईल उघडला आणि विपरीत घडलं आणि शेवटी तीघांना राजीनामे द्यावे लागले..अरेरे, हे काय मंत्रीसाहेब..? खाया पिया खूछ नही..गिलास तोडा बाराणा..!! हे तुमच्या तिघांबाबत तंतोतंत लागू पडतं बघा.. आता एवढाच मुड झाला होता तर कमीत कमी सभागृहाच्या बाहेरतर जायचं.. ! पण म्हणतात ना.. वेळ आणि काळ कोणाला सांगून येत नाही.. त्यातच कोंबडीचा आणि तंगडीचा मामला म्हटलं की थोडं जपूनच रहायलं हवं..! पण या पुढा-यांना कोण सांगणार.. ? बरं एवढ्यावरच थांबतील तर हे राजकारणी कसले..? तिकडं बिहारमध्ये एक आमदार महाशय एका कार्यक्रमात काही ललनांबरोबर ठुमके मारत होते..तेही सर्वांसमोर.. त्यांचं वयही जवळपास ५५ च्या वर..पण रात्रीच्या त्या गुलाबी थंडीत आमदारसाहेबांनाही काही कंट्रोल झालं नाही..त्यांनीही त्या छमछमबरोबर तंगडीतोड डान्स केलाच..!!
सांगायाचा मुद्दा एवढाच की कोंबडी काय अन् तंगडी काय नादखुळाच..! पण जरा जपून..! कमीत कमी सार्वजनिक ठिकाणांचा तरी त्याला अपवाद करावा एवढंही ताळतंत्र या नेतेमंडळींनी पाळायला नको का…?

“ विठू माझा लेकुरवाळा !..संगे भक्तांचा मेळा…!!!

विठ्ठलाचे पंढरपूर

“युगे अठ्ठावीस उभा विठेवरी…” असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पंढरपूरचा विठोबा अख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत.दक्षिण भारतातलं एक मोठं तिर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्षांपासून या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. विशेषतः आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येनं पायी चालत येण्याची परंपरा असलेला विठोबा हा एकमेव देव असावा..ज्याच्या दर्शनासाठी तहान भूक आणि सगळं कामं विसरुन पायी वारी करणारे लाखो भाविक आहेत…अशा पंढरपूरचं महात्म्यही तेवढचं मोठं आहे. जात-धर्म-पंथाच्या पलिकडे असलेला हा विठोबा सर्वांचा लाडका आहे. महाराष्ट्राला असलेल्या थोर संत परंपरेतही या विठुरायाला अनन्यसाधारण महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, संत चोखामेळा, किती नावं सांगू, सगळ्यांचा आवडता देव म्हणजे विठोबा..या सर्वांच्या अभंगात विठोबाचं वर्णन केलेलं आहे..ही परंपरा फार मोठी आहे….त्यावर खूप लिखाण झालेलं आहे. वारकरी संप्रदायाची महिमा अगाध आहे. अशा या माझ्या सावळ्या विठुरायावर मी काय लिहणार..त्याचं महात्म्य थोर संतांच्या अभंगातून आणि किर्तनातून तुम्ही समजून घेऊ शकता…अशा या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ तुम्हाला लागली असेल किंवा अजून तुम्ही या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं दर्शन घेतलेलं नसेल तर त्या संदर्भातली काही माहिती या ब्लॉगमध्ये देत आहे..
विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, विठुराया, विठुमाऊली अशा अनेक नावांनी संबोधलं गेलेल्या या सावळ्याहरीच्या वास्तव्यानं पावण झालेलं ठिकाण म्हणजे पंढरपूर…पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात येतं. सोलापूरपासून जेमतेम ७५ किलोमिटरवर हे पंढरपूर आहे. पुणे, कोल्हापूर, सातारासह महाराष्ट्रातल्या मुख्य शहरातून पंढरपूरला एसटीची थेट सेवा आहे. तसच मिरज-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गानंही तुम्ही पंढरपूरला भेट देऊ शकता..स्वतःच्या वाहनानं पंढरपूरला जायचं असेल तर पुणे-सोलापूर ह्या राष्ट्रीय महामार्गावरुनही तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता..तसच पुण्याहून सासवडमार्गेही स्वतःत्र रस्ता आहे… कोल्हापूरवरुनही सांगोलामार्गे तुम्ही रस्त्यानं पंढरपर गाठू शकता..मराठवाड्यातून जाणार असाल तर तुळजापूरमार्गे सोलापूरहून किंवा बार्शी, कुर्डुवाडीमार्गानंही तुम्हाला पंढरपूरला जाता येईलं…पंढरपूरला जोडणारे हे सर्व रस्ते चांगले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना त्रास होणार नाही आणि वेळेतही पोचता येईलं…
पंढरपूरात राहण्यासाठी सर्व प्रकारची सोय आहे. शहराचा वाढता पसारा आणि वारीकाळात लाखोंच्या संख्येनं येणा-या वारक-यांची राहण्याची सोय या शहरात होते. दोन लाख लोकसंख्येचे हे शहर वारीकाळात सात-आठ लाख वारक-यांना सामावून घेतं. चंद्रभागेचा वाळवंट या यात्राकाळात वारक-यांच्या वास्तव्यानं फुलुन जातो..हा भक्तांचा मेळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो..संतांच्या नावानं मठ या शहरात आहेत. त्यातूनही राहण्याची सोय होऊ शकते. तुम्ही जर हॉटेलमध्ये राहू इच्छित असाल तर त्याचीही चांगली सोय पंढरपूरात आहे. वारीकाळात तुम्हाला यायचं असेल तर मात्र हॉटेलचं बुकिंग महिनाभर अगोदरच करुन ठेवणं सोयीचं ठरेलं. पंढरपूरच्या एसटी स्टँडजवळ अनेक हॉटेल्स आहेत. ज्यांकडे तुम्हाला राहण्याची सोय करता येऊ शकते.

पंढरपूरचे ऐतिहासिक महत्व..
पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. शहराला अर्धचंद्राच्या आकारानं भीमा नदीनं वळसा घेतलेला आहे म्हणून या नदीला चंद्रभागा असंही म्हटलं जातं. त्याच्यामागंही मोठी अख्यायिका आहे..शापीत चंद्रानं या पाण्यात स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला आणि नदीनं चंद्राकृती वळण घेतलं म्हणूनही तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं अशी एक अख्यायिका सांगितली जाते..पण वारकरी संप्रदायात या नदीला चंद्रभागा या नावानंच ओळखलं जातं..तसचं या नदीला भीवरादेखील म्हटलं जातं. संतांच्या अभंगातूनही या नदीचं वर्णन चंद्रभागा किंवा भीवरा असंच केल्याचं दिसून येतय. अशा ह्या पंढरपूरचा उल्लेख प्राचीन ग्रंथातही सापडतो..शालिवाहन राजांच्या काळात इ.स. ८३ मध्ये या शहराचं संवर्धन केल्याचे दाखले सापडतात. तर इ.स ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळातही पंढरपूरचा उल्लेख आढळून येतो..पंढरपूर अत्यंत प्राचिनकाळापासून असल्याचे अनेक दाखले सापडतात. तो इतिहासाचा विषय आहे. त्यावर जास्त लिहित नाही..इतिहासातल्या थोर व्यक्तीमत्वांनीही या पंढरपूरला भेट दिल्याचे दाखले आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे, बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, यांच्यासह अनेक राजे महाराजे आणि सरदारांनी या विठ्ठलाला मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, सोनं या दागिण्यांचा खजाना आजही मंदिराच्या विश्वस्तांकडे आहे…यावरुनच हे दैवत किती प्राचिन आहे याची प्रचिती येते..

नामदेव पायरी

भीमानदीच्या काठावरच विठ्ठल रुखमाईचं भव्य मंदिर आहे..सोलापूरातून तुम्ही गोपाळपूरच्या जुन्या दगडी पुलाच्या मार्गानं जर पंढरपूरात प्रवेश केला तर तुम्हाला लांबूनच कळसाचं दर्शन होतं..मंदिराच्या समोरच नामदेव पायरी आहे. विठोबाचं दर्शन घेण्याअगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं जातं. तर मंदिराच्या अगदी समोर नदीपात्रात पुंडलिकाचं मंदिर आहे. या दोन्हीबद्दल वारकरी साहित्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे… पंढरपूरला येणा-या भक्तांना वारकरी म्हणतात. या वारकरी संप्रदायात तुळसीची माळ घालण्याची परंपरा आहे. त्यांना माळकरीही म्हणतात..काळा बुक्का हा विठ्ठलाच्या नावानं कपाळी लावला जातो..पंढपूरात आलेला वारकरी चंद्रभागेत स्नान करुन विठ्ठलाचं दर्शन घेतो..सध्या सगळ्याचं तिर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या नद्यांची जी अवस्था आहे तीच या भीमानदीचीही झालेली आहे..प्रदुषणानं नदीचं पाणी गढूळ झालय..पण वारकरी या नदीत डुबकी मारूनच विठोबाचं दर्शन घेतात..

पंढरपूरची वारी परंपरा…
चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या चार महिन्यात पंढरपूरला यात्रा भरते. त्यातल्या आषाढ महिन्यात सर्वात मोठी यात्रा पंढरपूरात भरते. या यात्राकाळात पंढरपूरला येणा-यांची संख्या आठ लाखापासून दहा लाखापर्यंत जाते..आषाढी आणि कार्तिक एकादशीला शासकीय महापूजा केली जाते…पंढरपूर, वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी, वारी परंपरा, संत साहित्य यावर प्रचंड लिखाण आहे. त्यातलं काही वाचनात आलं तर जरुर वाचा..संत एकनाथ, नामदेव, तुकाराम, यांच्यासह सर्व संतांच्या अभंगातून या सावळ्या विठुरायाचं वर्णन केलंल आहे. ते वाचनात आलं तर विठोबाचं महात्म्य लक्षात येईल..
विठ्ठलाला अनेक नावानं संबोधलं जातं..तसच तो विष्णुचा अवतार आहे असंही म्हटलं जातं…मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माथा टेकवण्याची परंपरा जर कोठे असेल तर ती फक्त या विठ्ठल मंदिरातच आहे..विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचं भाग्य वारीकाळात ज्यांना मिळतं ते धन्य धन्य झाल्याचे भाव व्यक्त करत वारी सार्थकी झाल्याचं मानतात..
वारीकाळात पंढरपूरला घोडे बाजारही भरतो. अस्सल जातीचे घोडे या बाजारात तुम्हाला मिळू शकतात…
पंढरपूरात विठ्ठलाच्या सेवेक-यांना म्हणजेच पुज-यांना बडवे म्हणतात तर रुक्मीनीची सेवा करणा-या पुजा-यांना उत्पात म्हणतात…
तुम्ही जर वारीकाळ सोडून इतर दिवशी पंढरपूरला भेट दिली तर शांतपणे दर्शन घेता येईलं. विविध प्रकारच्या पूजा करता येतील. त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील ते मात्र वेगळे..कारण अनेक तिर्थक्षेत्रांचं सध्या जसं बाजारीकरण झालय तसच या पंढरपूरातही झालय. त्यामुळे तुम्हाला काही पैसे मोजून पूजा वगैरे करता येईलं..बाकीचं सर्व विसरुन फक्त एका विठ्ठलाच्या दर्शनासाठी कधीतरी वेळ काढा आणि यात्राकाळ सोडून पंढरपूरला एकदा अवश्य भेट द्या…

!! भीऊ नको , मी आहे तुझ्या पाठीशी !!..अर्थात अक्कलकोट स्वामी समर्थ..!!!!

अक्कलकोट स्वामी

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाचा विचार मनात आला असेल तर तो अंमलात आणण्यास काहीच हरकत नाही..अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घेण्यास कोणत्याही विशेष तिथीची किंवा सण-उत्सवाची गरज नाही.तुम्ही बारा महिने कोणत्याही दिवशी दर्शनासाठी जाऊ शकता..गुरुवार हा स्वामींचा दिवस. ते दत्ताचे अवतार..त्यामुळे गुरुवार, दत्तजयंती, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, गुरुपौर्णिमा असे काही दिवस भाविकांचा ओघ इतर दिवसांपेक्षा जास्त असतो…पण तरिही त्या दिवशी जायचा योग जुळून आला तरीसुद्धा नक्की जा…
अक्कलकोट हे सोलापूरपासून अवघ्या ४० किलोमिटर अंतरावर आहे. सोलापूरातून दर पंधरा ते वीस मिनिटाला अक्कलकोटला जाण्यासाठी एसटीची सोय आहे. त्यामुळे तासात तुम्ही अक्कलकोटला पोहचू शकता..अक्कलकोट एसटी स्टँडवरुन रिक्षानं स्वामींच्या मंदिराकडे जाण्याची सोय आहे. स्वतःचं वाहन असेल तरी उत्तमच..मंदिराकडे जाण्याचा रस्ता एसटी स्टँडच्या बाजूला आहे, तो थेट मंदिराजवळ जातो..रिक्षा किंवा दुचाकी असेल तर शहरातून शार्टकट मारता येतो. पण अरुंद रस्त्यामुळे बाहेरचा रस्ता निवडल्यास उत्तम. समर्थांच्या मंदिराजवळ गेलं तरी तुम्हाला मंदिर आल्याचं जाणवणार नाही एवढी शांतता जाणवते..तसच इतर मंदिरासारखं हे मंदिर लांबून दिसत नाही..समर्थांचं मंदिर म्हणजे एक मोठा वाडा आहे. आत गेल्यानंतर एक वटवृक्ष आहे. म्हणूनही त्यांना वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज असं म्हणतात..या वटवृक्षालाही महत्व आहे. दत्त अवतारातल्या मंदिरात वटवृक्ष हा आवर्जून आढळतो. त्याची अख्यायिका आहे..पण मी त्यावर जास्त लिहणार नाही… मंदिरात तुम्हाला पूर्ण शांतता जाणवेल..कुठलिही गर्दी नाही, गोंधळ नाही अगदी शांत..दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारातच काही वेळ शांतपणे घालवा. मनाला शांती लाभेल. मनात कसलाही भाव न ठेवता पंधरा वीस मिनीटं बसा तुम्हालाच एकप्रकारची मनःशांती जाणवेल..
स्वामी समर्थांच्या मंदिराशेजारी इतर देवस्थानाच्या ठिकाणी असतो तसा बाजार भरलेला नाही..अगदी मोजकीच छोटी टपरीवजा दुकानं..पूजेचं साहित्य, आणि स्वामी समर्थांविषयी माहिती देणारी पुस्तकं, सीडी, माळा, फोटो, प्रसाद एवढाच काय तो मांडलेला बाजार.. विशेष म्हणजे समर्थांच्या दर्शनासाठी कोणत्याही दलालाची गरज नाही. दर्शनासाठी कुठलाही पास लागत नाही. मंदिर समिती, त्यावरचे राजकीय नेते त्यांच्याकडचा व्हीआयपींचा स्वागत सत्कार असला काहीही प्रकार नाही..कोणीही यावं रांगेत उभं राहून समर्थांचं दर्शन घ्यावं. मी तर पाहिलेलं हे एक उत्तम आणि छान मंदिर आहे..
स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर दोन तीन मिनीटाच्या अंतरावरच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. या ठिकाणी स्वामीभक्तांसाठी महाप्रसाद मिळतो..एका मोठ्या हॉलमध्ये स्वामीभक्तांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. एकावेळी अंदाजे तीन चारशे लोक बसतील एवढी व्यवस्था आहे..महाप्रसादाचा हा आस्वाद जरून घ्या..साध्या स्वच्छ महाप्रसादाचे चार घासही तुम्हाला तृप्तीची ढेकर देऊन जातील..कारण ते खाणावळीतलं किंवा हॉटेलमधलं जेवण नाही तर तो समर्थांचा आशिर्वाद लाभलेला प्रसाद आहे..महाप्रसाद सकाळ-संध्याकाळ मिळतो..विशेषतः सकाळी नऊनंतर दुपारी सुमारे दोन वाजेपर्यंत आणि नंतर संध्याकाळी सहा-सातनंतर नऊ वाजेपर्यंत, यावेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
( महाप्रसादाच्या वेळेची एकदा खात्री करुन घ्या..) महाप्रसादानंतर हॉलच्या आवारातून एसटीची सोय आहे. त्यामुळे तुम्हाला स्टँडवर जाण्याचीही गरज नाही…
तुम्ही जर इतिहासप्रेमी असाल तर समर्थांच्या दर्शनानंतर एसटी स्टँडजवळ असलेल्या राजवाड्याला भेट द्यायला विसरु नका..भोसले संस्थानचा हा राजवाडा आहे. फत्तेसिंह भोसलेंची अक्कलकोट ही राजधानी होती…आता ह्या राजवाड्यात भोसल्यांचा त्यावेळचा शस्त्रसाठा आहे..थोडा वेळ या राजवाडा आणि वस्तूसंग्राहालयाला दिला तर समर्थांच्या दर्शनाबरोबरच तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासातलं एक उज्ज्वल पान या राजवाड्याच्या भेटीतून पहायला मिळेल..स्वामी दर्शनाबरोबरचं इतिहासाच्या एका साक्षिदाराला भेट देण्याची ही संधी सोडू नका..

फत्तेसिंह भोसले संस्थानचा राजवाडा

भोसल्यांचा शस्त्रसाठा

अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्ताचे चौथे अवतार आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे कर्नाटकातील गाणगापूरचं दत्त मंदिर,सांगलीतल्या नृसिंहवाडी यांच्याएवढचं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं महात्म्य आहे. इ.स. १८५६ मध्ये स्वामी अक्कलकोटात आल्याचे संदर्भ मिळतात. याच अक्कलकोटात त्यांनी २२ वर्ष वास्तव्य केलं आणि शेवटी समाधी घेतली असं सांगितलं जातं…त्यांच्या दर्शनानं एक आत्मिक समाधान लाभतं हेच स्वामी समर्थांच्या दर्शनाचं महात्म्य आहे..
सोलापूरला भेट देण्याचा विचार असेल तर थोळावेळ काढून जरुर स्वामी समर्थांचं दर्शन घ्या…अवधूत चिंतन श्री गरुदेव दत्त !..जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय….!!
( ह्या लेखातून फक्त स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं यासाठी माहिती देणाचा प्रयत्न केलेला आहे. समर्थांचं महात्म्य विशद करण्याची बुद्धी आणि ताकद माझ्यासारख्या पामरामध्ये नक्कीच नाही..त्यामुळे हा लेख फक्त अक्कलकोट स्वामी दर्शनासाठी थोडासा मार्ग दाखवणारा समजावा…तसच मला त्या मंदिराबद्दल जे वाटलं ते मी लिहलय..एवढचं…)

महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी

महाराष्ट्रात सध्या २७ जिल्हा परिषद आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा फड रंगलाय. जिल्हा परिषदांसाठी ७ तारखेला मतदान होतय तर १६ तारखेला महानगरपालिकांसाठी मतदान होतय. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यात निवडणुकीचा माहौल बनलाय. तसच या निवडणुका म्हणजे सर्वच राजकीय पक्षांसाठी २०१४ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल आहे. यातूनच या विधानसभा निवडणुकीचा पाया भक्कम केला जातोय. पण सध्याच्या या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर नजर टाकली तर ह्या निवडणुका म्हणजे खरचं लोकशाहीतल्या आहेत, का तो एक फार्स ठरतोय असं चित्र सर्वत्र दिसतय. .तिकिट वाटपा पासूनच सुरुवात करायची तर सामान्य कार्यकर्त्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असणा-या या निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळलेली दिसत नाही.. सगळ्याच पक्षांनी आपले नातेवाईक आणि पोराबाळांची सोय लावून ठेवलीय. एकाच घरात आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकांची सत्ता एकवटलेली दिसतेय. सर्वच ठिकाणी आपल्याच बगलबच्च्यांना उमेदवारी देण्यात या नेत्यांनी सगळी ऊर्जा खर्ची घातलीय..तर ज्या जागा शिल्लक राहतील त्यावर मग पैसेवाल्यांची वर्णी लागलीय..अपवादानच सामान्य कार्यकर्त्याला लॉटरी लागलीय. त्यातच ५० टक्के महिला आरक्षण लागू झालय. त्या माध्यमातून तरी सामान्य कुटुंबात सत्तेची गंगा पोचेल असं वाटलं होतं. पण तिथंही याच नेत्यांच्या घरच्या बायकांना उमेदवारी देण्यात आलीय. म्हणून उमेदवारीसाठी हाणामारीचे प्रसंग घडले. तर अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता शेवटच्याक्षणी कट करण्यात आला..अशारितीनं आपल्याच घरात उमेदवारी मिळवण्यात हे नेते आघाडीवर राहिले.. मग लोकशाही म्हणजे काय..फक्त मतदानातून निवडुण आलेले हे सरंजामदारच ना..!

उमेदवारीत घराणेशाहीचा विषय झाल्यानंतर जरा प्रचारावर एक नजर टाकून पहा.. कोणत्याही नेत्याच्या भाषणात विकासाचा मुद्दा अगदीच अभावानं आलेला दिसतोय. सत्तेत भागिदार असलेले मित्रपक्षच एकमेकावर चिखलफेक करण्यात एवढे व्यस्त राहिले की, आपण एकाच मंत्रिमंडळात काम करतोय ह्याचं भानही त्यांना राहिलं नाही..नारायण राणे, अजित पवार, आर आर पाटील ह्या नेत्यांनी एकमेकांची जेवढ्या शेलक्या शब्दात उतरवता येईलं तेवढी उतरवली..त्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही भाग घेतला..या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या धुळवडीत विकासाचा प्रश्न मागे पडला. जे काम विरोधीपक्ष करायची आजपर्यतची परंपरा होती ती सत्ताधारी पक्षांनीच पार पाडली..तुमचे उमेदवार जास्त निवडूण येतील का आमचे ही गोळाबेरिज करण्यातच हे दोन्ही काँग्रेसवाले आघाडीवर राहिले..मग कोणत्या मंत्र्यावर खुनाचे गुन्हे आहेत इथंपासून वेंगुर्ल्याचा राडा कोणी केला अशी आव्हानाची भाषा झाली..मग जर एखादा मंत्री खुनासारख्या गुन्ह्यात आहे ह्याची माहिती गृहमंत्र्यांना आहे. तर तसे आरोप करणारे गृहमंत्री कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्यांच्या मांडीला माडी लावून बसतातच कसे ?.. याचं साधं भानही या मंत्रीमहोदयांना नसावं याला काय म्हणावं.?. महाराष्ट्र हा राजकीयदृष्या परिपक्व मानलो जातो. विरोधक सत्ताधा-यांवर टीका करताना कमेरखालची भाषा वापरत नव्हते किंवा टीकेची पातळी एवढ्याखाली घसरलेली नव्हती..एवढचं काय शरद पवार-गोपानीथ मुंडे यांनीही यापूर्वी एकमेकांवर टीका केल्या पण त्यांची भाषा सौम्य होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अपवाद वगळता इतरांनी भाषा वापरताना ती जबाबदारीनं वापरली. पण सत्तेत असलेल्या आर. आर. पाटील आणि अजित पवार यांची भाषा मात्र आजच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही..

राज्यात आजही विजेचं भारनियमन, पाण्याची समस्य़ा, रस्त्यांचे प्रश्न, शाळा, आरोग्य व्यवस्था यांच्यावर आणखी खूप काम करण्यासारखं आहे. मात्र हजारो कोटी रुपयांचा निधी आमच्या मंत्र्यांनी दिला, एवढे मोठे आकडे सांगण्यातच हे मंत्रिमहोदय धन्यता मानताना दिसतायत..पण हा पैसा नेमका गेला कुठे ? यावर त्यांच्याकडेही उत्तर नाही..प्रचारात विकासाच्या मुद्द्यांना बगल देण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न झालेला दिसतोय…प्रत्येक निवडणुकीच्या तोडावर कोणतातरी भावनात्मक मुद्दा उकरुन काढायचा आणि त्यावरुन रान उठवायचं हा राजकीय पक्षांचा नवा फंडा बनलाय..भावनेचा मुद्दा प्रचारात आला की इतर मुद्दे आपोआपच मागे पडतात..जिजाऊंचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा, आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न असो किंवा इतर कोणतातरी मुद्दा चर्चेत आणायचा आणि त्याचीच रि ओढत बसायची हा राजकीय नेत्यांचा अलिकडचा डाव झालाय. मग त्यात विरोधक असो की सत्ताधारी कोणताच पक्ष यापासून अलिप्त राहिलेला नाही.. देश स्वतंत्र होऊन ६०-६५ वर्ष झाली तरीही विज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मुलभूत प्रश्नांचीच आपण अजून तड लावू शकलो नाही..तर पुढच्या विकासाच्या गप्पा कोसो दूर आहेत.. या निवडणुकांत तर हे मुद्ददेही आले नाहीत.. त्यालाही आत्ता बगल देऊन वैयक्तीक पातळीवर येऊन टीका करण्यात आली..त्यांना ना जनतेच्या प्रश्नाशी देणंघेणं आहे ना विकासाशी….त्यांना फक्त सत्ता हवीय.. तीही आपल्या घरात, आपल्या नातेवाईकांकडे आणि बगलबच्च्यांकडे..मग त्यात कोणाचा मुडदा पडो वा पैशाचा पाऊस पडो त्यांना त्याच्याशीही काहीच देणंघेणं नाही. फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच गणित जुळवण्याचा या राजकीय नेत्यांचा एककलमी कार्यक्रम आहे…आणि सत्तेच्या धुंदीत नवे सरंजामदार, जमीनदार, आणि घराणेशाही नव्या रुपानं येऊ पहात आहे..तर सामान्य जनता मात्र उरलीय फक्त मतदानासाठी आणि कार्यकर्ते घोषणा देण्यासाठी..ही या लोकशाहीची शोकांतिका नाही काय.?.. Read more…

गणित-आयुष्यभर न सुटलेलं..

गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणा-यांचा मला हेवा वाटतो. यांना १०० मार्काचा पेपर असो किंवा १५० मार्कांचा पैकीच्या पैकी मार्क पाडतातच. अशा विद्यार्थांची संख्या कमी असली तरी त्यांना एवढे मार्क कसे काय पडतात याचं मला आश्चर्य वाटत राहिलय. बरं त्यातल्या एखाद्याला एक दोन मार्कजरी कमी पडली तरी त्यांच्या चेह-यावरचे भाव जणू काही आभाळ कोसळलय की काय असेच असतात. १०० पैकी ९९ किंवा १५० पैकी १४९ मार्क मिळाले याचा आनंद होण्यापेक्षा एक मार्क कसा काय कमी पडला याचचं त्यांना मोठं टेन्शन.. मला नाही बाबा कोणत्याच विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाली..आपली पोच फक्त फर्स्ट क्लास पर्यंतचीच..गणित म्हणावं तर दहावीला कसंबसं पास झालो आणि इतर विषयांची मार्कस बरी असतानाही फक्त या गणितानं सगळा खेळ खाली आणला..बरं या गणिताचं कोडं कधी मला सुटलच नाही..ती आकडेमोड, लसावी-मसावी, द.सा.द.शे. पर्यंत ठीक होतं. पण ते कंस सोडवा वगैरे प्रकार काय, मला आयुष्यात जमला नाही..काय तर ते कंसात काही आकडे वजाबाकी, भागाकार, गुणिले करा, कंसाच्याबाहेर डोक्यावर एखादा अंक किंवा अक्षर आहेच ! मग ते सोडवा…मला कळत नाही कंस सोडवायचाच तर मग त्यांना कंसात टाकलच का ?..बरं त्या आकड्यांनी किंवा अक्षरांनी काय गुन्हा केलाय म्हणून त्यांना पोलीस कोठडीत टाकावं तसं कंसात बंद केलय ?..आणि त्याचा व्यवहारात तर काय उपयोग झाल्याचं मला आठवत नाही.गणिताबद्दलचं माझं मत हे पहिल्यापासूनचं म्हणजे जेव्हा गणितानं एकमागून एक वर्षात दगा दिला तेव्हापासूनचं..

दहावी झाली आणि या गणिताचा ताप संपला..सुटलो बुव्वा आता, असं म्हणत कला शाखेला गेलो..पण आजही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ते हे की, हे विद्यार्थी एवढे तरबेज कसे ? बरं पेपर हा तीन तास आणि १०० किंवा १५० मार्काच्या मर्यादेत असतो म्हणून बरं. त्यांना अख्खं पुस्तक विचारलं तरी ते सांगणारच..असो मला आता गणित आठवण्याचं कारण असं की जगण्यासाठी धडपड करणा-या माझ्यासारख्या असंख्य मित्रांनी या गणिताचा तिरस्कार केलाय. त्याच्यापासून दहावीनंतर सुटका करुन घेतलीय पण कोणाच्याही आयुष्यातून गणित त्यांना सोडून गेलेलं नाही. आयुष्यातली ही गणितं सोडवताना जीव अनेकदा मेटाकुटीला येतो. पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालताना आकडेमोड करावी लागते. तिथं गणितातलं कुठलचं सुत्र कामाला येत नाही. शाळेतल्या गणिताला कसं त्या विशिष्ट सुत्रात बांधलेलं असतं. ज्याची ती सुत्रं पक्की तो पायरी पायरीनं गणित सोडवतो. एखादी पायरी चुकली तर उत्तर चुकतं, एक दोन मार्क कमी होतात..पण आयुष्यातली गणितं सोडवताना कुठं असतात अशी सुत्रं. एखादी पायरी चुकली की सगळं मुसळ केरात…

जगण्यासाठी सुरु असलेल्या या धडपडीत कोणाची किती गणितं सुटली आणि किती राहिली हे वेगळचं. बरं समस्या थोड्याफार फरकानं सारख्याच असल्या तरी प्रत्येकाची गणित सोडवण्याची पद्धत वेगळी, सुत्र वेगळं आणि अर्थातच उत्तरही वेगळंच…मग ज्यांनी गणितात पैकीच्या पैकी उत्तरं मिळवली होती त्यांच्याही आयुष्यातल्या गणिताची बाकी कधी बेरजेत, शिल्लकी राहत असेल काय. का त्यांच्याही आयुष्यातली गणितं सोडवताना दमछाक होतेच ना.? कितीही आकडेमोड करा सर्वसाधारणपणे सर्वांचीच शिल्लक एकतर शून्य येते किंवा वजा येते, शिलकी गणित कधी बेरजेत राहतच नाही, जसं आपल्या राज्याचं अंदाजपत्रक नेहमी वजाबाकीचचं असतं आणि कर्जाचा डोंगर वाढलेला असतो. जगण्याच्या या धडपडण्यात गणित सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक गणित सुटलं तर दोन तीन पुन्हा उभी राहतातच की..पगाराच्या दिवसाची आतुरतेनं वाट पहायची आणि पगार जमा होतात हिशोबाची वजाबाकी सुरु..पेपरवाला, टीव्हीवाला, दूधवाला. भांडीवाली, कपडेवाली, लाईटचं बिल, घराच्या कर्जाचा हप्ता, मुलांची शाळेची फी, एलआयसीचा हप्ता, महिन्याचा किराणा ह्या सर्व पायऱ्या सोडवता सोडवता शिल्लक काही रहातच नाही.. सगळं कसं जेमतेम, तेवढचं किंवा वजाबाकीतच जातं..मग आयुष्याच्या संध्याकाळचा विचार करुनच सगळं गणित बिघडतं..पगाराचा सर्व पैसा तर महिन्याची आकडेमोड करण्यातच गेला तर मग बाकी काय राहणार ?..आमचा कंस त्यामुळेच कधी सुटला नाही, तो शाळेतल्या गणिताचा असो किंवा आयुष्यातल्या गणिताचा ! आमचे आकडे आणि अक्षर कंसातच राहिली, वर कंसाच्या बाहेर असलेल्या आकड्याप्रमाणं भविष्याची चिंता मुलाची आणि आपलीही कायमच राहते ! नाही सुटत हे गणित. माझचं काय अनेकांचंही असचं होतच.. अगदी कंस न सोडवल्यासारखं…

बरं, आयुष्यातली ही बेरीज वजाबाकी करताना पगार हाच आम्हाला मिळणारा एकमेव आकडा..त्यामुळे वजाबाकीसारखं एक उसणा आकडा घेण्याचंही धाडस होत नाही..कारण घेतलेला तो आकडा पुन्हा परतच करायचाय ना !..”त्या” लोकांचं आपलं बरं असतं बुआ.. टेबलावरुन खालून आणि कुठुन कुठुन येतात त्यांच्याकडे हे मोठाले आकडे. ते आकडे एकले तरी आपल्या पोटात आकडा येतो..त्यांना नसेल का चिंता त्यांच्या आयुष्याची गणितं सोडवण्याची ? आपण म्हणतो कशी असेल ? सर्व बाजूंनी तर जमाचं होतेय त्यांच्या गणिताच्या या खेळात. त्यांना कुठली आलीय गणित सोडवण्याची समस्या ? पण त्यांच्याही आयुष्यात न सुटलेली गणितं असतातच !…आपली आकडेमोड, गणिताच्या पाय-या कमी असतली म्हणून, त्यांच्या पाय-याही मोठ्या असतील. म्हणूनच तर त्यांचे आकडेही मोठे आणि शिल्लकीचं गणितही मोठं ! ..मग कोणालाच सुटत नाही का या आयुष्याचं गणित?..अनेकजण मोठ्या फुरशाकीनं सांगत असतात..आपलं बुवा काही गणित अडतच नाही कुणामुळं आणि कशामुळही !…खरचं त्यांची गणितं सुटलेली असतात का ? त्या १०० किंवा १५० पैकी तेवढेचं मार्क घेणा-या विद्यार्थांसारखी ! का एक दोन मार्क पडले म्हणून चिंता करणा-या त्या विद्यार्थासारखी आणि माझ्यासारख्या नेहमीच गणिताचा कंस न सोडवलेल्या माणसासारखी..

नाईट शिफ्ट- एक शापीत रात्र

नाईट शिफ्ट हा एक वाईट प्रकार आहे. खरं तर निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे सकाळी उठणं, दिवसभर आपली दिनचर्या करुन रात्री झोपणं हा निसर्गाचा नियम. लहानपणापासून आपल्या शरिरालाही याचीच सवय झालेली असते. पण काही नोकऱ्या अशा असतात की त्यांना नाईट शिफ्ट असते..आपल्याकडे पोलिस, रात्रीचा प्रवास करणाऱ्या सरकारी, खाजगी बसचे चालक यांनाही नाईट शिफ्टच असते. औद्योगिक वसाहतींमध्येही दिवसरात्र काम चालतं. त्यामुळे रात्रीचा दिवस करणाऱ्या या लोकांचं दुखही तेवढच आहे. खरतर मीसुद्धा त्याच नाईट शिफ्टला सरावलेला प्राणी..जवळपास पंधरा वर्षापासून मलाही या नाईट शिफ्टची सवय झालीय. नाईट शिफ्टला काम करणाऱ्या माणसांचं सर्व जगच बदलून जातं. सगळं जग झोपलेलं असतं तेंव्हा या लोकांचा दिवस सुरु होतो आणि इतरांचा दिवस सुरु झाला की यांची रात्र सुरु होते..खरं तर रात्रीपाळीत काम करायला कोणालाच आवडत नाही.. कोणीही आनंदानं हे काम करत नाही. पण पर्याय नसतो. त्यातही ज्यांना रात्रभर जागून काम करावं लागतं त्यांचे तर खूपच हाल..

तुम्ही म्हणाल त्यात काय, तुम्ही काही एकटेच आहात रात्रपाळीत काम करणारे ? पण तसं नाही, अनेकजण रात्रपाळीत काम करतात त्या सर्वांची दुखः सारखीच. सगळेच समदुखी. त्यांच्या दुखःला मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न कतरतोय एवढचं..! काय आहे की मुळातच रात्रपाळी लागली म्हटलं की पोटात गोळा येतो.. काहीजण तसं दाखवत नाहीत कारण त्यांना त्याची सवय झालेली असते. नवख्या लोकांना सुरवातीला त्याचा त्रास होता. हळूहळू त्याची सवय होत जाते. पण मी असेही काही महाभाग बघितलेत की नाईटशिफ्ट लागली म्हटलं की त्यांची तब्येत बिघडते.( खरी नव्हे रात्रपाळी टाळण्याचा तो एक बहाणा असतो ) आणि दुसरं म्हणजे नाईट शिफ्ट लागली की हमखास एक दोन दांड्या तर मारणारच.. मला या दांड्या मारणाऱ्यांचा ना हेवा वाटतो. बिनधास्त दांडी मारण्यालाही धाडस लागतं तो भाग वेगळा..पण मला नाही अशी दांडी मारायला मिळाली..

खरं तर रात्रीपाळीमुळे शारिरीक त्रास होतो. ऍसीडीटीचा त्रास सुरु होतो. तर काहीजणांना पोटाचे विकार, डोळ्यांचा त्रास. पाठ दुखण्याचा आजार. एक ना दोन अनेक व्याधीच मागे लागतात. आता त्याकाही फक्त रात्रापाळीमुळेच होतात असं नाही तर रात्रीपाळीमुळे त्या त्रासात वाढ होते हे मात्र नक्की. एकदा असंच पोट दुखणं आणि चक्कर येण्यासारख्या तक्रारीमुळे मी एका डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधाबरोबर जी पथ्यं मला सांगितली त्यानंतर मी त्या डॉक्टरकडे पुन्हा गेलो नाही..सकाळी पाच सहा वाजता उठून व्यायाम करणे, सात वाजता कॉफी, नऊ वाजता ब्रेकफास्ट, दुपारी १ वाजता जेवण, चार वाजता कॉफी, सहा वाजता पुन्हा फलाहार आणि रात्री नऊ वाजता जेवून अकरा वाजण्याच्या सुमारास झोपणं ही पथ्यं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होती. त्यातच पाणी घरचंच पिणे. ऑफीसला जाताना सोबत पाण्याची बाटली आणि फळं घेऊन जाण्यासही सांगितलं. मी म्हटलं डॉक्टर माझा दिनक्रम जर एवढा शिस्तशिर असता तर मी तुमच्याकडं ह्या तक्रारी घेऊन आलो असतो का..? पण त्यांनी सांगितलेला दिनक्रर्म काही नाईट शिफ्टवाल्यांना मिळत नाही त्यामुळे दुसरा डॉक्टर शोधणं हाच त्यावरचा पर्याय होता..खरचं सुखी असतात ती माणसं ज्यांचा दिनक्रम असा आखीव असतो..

बरं ज्या-ज्या संस्थेत हे रात्रपाळीचं झेंगट असतं तिथला शिफ्ट लावणारा शिव्या खाल्ला नाही असं कधीच होणार नाही..त्यानं शिफ्ट लावताना कितीही शास्त्रीय पद्धतीचा वापर करो शिव्या त्याच्या पाचविला पुजलेल्याच म्हणून समजा..आम्हालाच नाईट शिफ्ट लागली का..? नेहमी आम्हीच दिसतो का त्यांना..? काहीजण तर रात्रीपाळी लागली की मागच्या रात्रपाळीचा हिशोबच काढतात..! हे झालं कर्मचाऱ्यांचं पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या बायकोकडूनही शिफ्ट शेड्युल लावणारा शिव्या खातोच. बिच्चारा आता त्याचा त्यात काय दोष.? पण शिव्याशाप त्याला मिळणारच..! दुसरं असं की काही कार्यालयात नाईट शिफ्टचा एक हत्यार म्हणूनही वापर केला जातो..जो वरिष्ठांच्या डोक्यात गेला त्याला नाईट शिफ्ट लागलीच म्हणून समजा..ती किती दिवस ह्याचा मग हिशोब नाहीच..काही ठिकाणी रात्रीचं काम संपवून विश्रांती घेण्यास मुभा असते पण ती फारच कमी कार्यालयात असते. अनेक कार्यालयात तर झोपण्यास सक्त मनाई असते. रात्रपाळीत काम करणाऱ्यांवर लक्ष ठेण्यासाठी एखादं भरारी पथकंही असतं..आत्ता तर अनेक कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही दहशत आहे. त्यामुळे रात्री जागून काढण्याशिवाय पर्यायच नाही..

या रात्रपाळीत गमती जमतीही खूप होतात. अनेकांना झोप आवरत नाही..दिवसभर झोप काढली तरिही रात्रीची झोप ही रात्रीचीच झोप..पण काहींना नाही झेपत हे जागरण..त्यात जर रात्रीपाळीचा तुमचा प्रमुख जर खडूस असेल तर तुमची वाट लागलीच म्हणा..! एकतर रात्रीचं जागरण, वरुन त्याची बोलणी खायची म्हणजे नको नको होतं..आमच्याकडे काहीजण संगणकावर काम करत करतच झोपा काढतात..तर काहीजणांना काम करता करता डोळा केंव्हा लागला हेही कळत नाही..त्याचे किस्सेही मजेशिर असतात. ते किस्से काही या ठीकाणी सांगत नाही..पण अशाच रात्रपाळीचा अनेकांनी सदुपयोगही करुन घेतलाय बरं का.! अनेकांनी या रात्रपाळीतच आपली “जुळवाजुळव” करुन घेतलीय. रात्रीच्या ब्रेकमध्ये चहाचा एकच पेला रिचवताना उद्याच्या दिवसाचं “सेटींगही” काहींनी पक्कं करुन ठेवलेलं..तर काहीजण “नको त्या अवस्थेत” सापडल्याची उदाहरणंही आहेत. त्याच्या चर्चाही सर्वांच्या तोंडी असतात..त्यामुळे नाईट शिफ्ट ही एक शाप असली तरी काहींना मात्र ती वरदान ठरली..याच रात्रीतून त्यांच्या जीवनाची पहाट झालीय..हेही नसे थोडके..

Post Navigation

Follow

Get every new post delivered to your Inbox.